पार्श्वभूमी

भारतीय शिक्षणक्षेत्रावर इंग्रजी शिक्षणाचा असलेला प्रभाव हा भारताच्या हजारो वर्षाची समृद्ध परंपरा असलेल्या शिक्षणाचे अवमूल्यन करतो.

हि ज्ञानेन सदृशं। पवित्रम् इहविद्यते॥

असा सिद्धांत सांगणाऱ्या या भारतासारख्या ज्ञानभूमीमध्ये आज उदरनिवार्हासाठी आवश्‍यक असलेल्या शिक्षणाला अतिमहत्त्व दिले गेले. त्यामुळे, जीवन जगण्यासाठी आवश्‍यक ती माहिती आणि तंत्रज्ञान उपलब्ध होऊनही जीवन का जगावे ? हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीतच राहतो.

त्याचा परिणाम मानसिक सुदृढता आणि आचरणातील शुचिता ही अलिकडच्या उच्चशिक्षणाच्या माध्यमातून मांडली जात नाही. पाप आणि पुण्य या मानवी जीवनाला शुद्ध करणाऱ्या प्रमुख संकल्पना बोथट होत गेल्या नि आज व्यक्तिगत आचरणातला भ्रष्टाचार हा अत्यंत सहजतेने मान्य करून, उच्चशिक्षित नागरिक जगताना आढळतात.

भारतीय संतसाहित्यामध्ये अनेक वैज्ञानिक व तात्त्विक तथ्यांचा उल्लेख आढळतो. अर्थात भारतीय संतांना भारतीय ज्ञानपरंपरेतून उपजलेल्या अनेक शोधांबद्दल माहिती होती, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.अनेक पाश्चात्त्य वैज्ञानिकांच्या नावे असलेले शोध हे पूर्वी भारतामध्ये लागले असल्याचे आता जगासमोर आले आहे. म्हणजेच, ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान, भक्ती, श्रद्धा या सर्वांचा ऊहापोह करणारे संतसाहित्य ह्याचा उच्चशिक्षणात समावेश होणे ही काळाची गरज आहे.