ब्लॉग
संत ज्ञानेश्वर ते अल्बर्ट आईन्स्टाईन
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड
युनेस्को अध्यासन प्रमुख व अध्यक्ष, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे
अध्यात्माचे अधिष्ठान मानणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांपासून विज्ञानाधिष्ठित जगप्रसिध्द अल्बर्ट आईन्स्टाईन हा प्रवास स्थळकाळाच्या दृष्टीने फारच दूरवरचा आहे. या संदर्भात आपल्याला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीच्या रामायण – महाभारताच्या काळाचा वेध आणि शोध घ्यावा लागेल.
संत ज्ञानेश्वर हे एक महान संत होऊन गेले. या भूमिकेतून ते एक भारतीय अध्यात्मशास्त्राचे प्रणेते व सर्व तत्त्वज्ञ संतांच्या प्रातिनिधिक स्वरूपाचे प्रतिक म्हणून ओळखले जातात. समृध्द अशा भारतीय संस्कृतीचे, मराठी साहित्याचे व वैभवशाली भारतीय अध्यात्म व विज्ञानाचे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांनी वैश्विक स्वरूपाचे प्रतिनिधीत्व केले. सर्वसामान्यपणे संत ज्ञानेश्वर व अल्बर्ट आईन्स्टाईन ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे सामान्य माणसाला काळाचा विचार केला तर दोन टोकाची वाटतात. खरे तर वरवर पाहता या दोन्ही महान व्यक्तींमध्ये फार थोडे साम्य जाणवते. तथापि, जर बारकाईने निरीक्षण केले तर, संत ज्ञानेश्वर व आईन्स्टाईन यांनी जगाला दिलेल्या संकल्पना व सिध्दान्त हे एकाच पातळीचे असल्याने ते शेवटी एकत्रच विलीन होतात, हे प्रकर्षाने जाणवते. कारण दोघांचेही चिंतन, हे निसर्गाचे तत्त्व सांगणारे ओहत. फक्त एकाचं सांगणं सूत्ररूप व दुसऱ्याचं शब्दरूप आहे.
मला प्रामाणिकपणे असे वाटते की, भगवद्गीतेवरील संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली टीका ज्ञानेश्वरी केवळ देवघरात पूजाअर्चा करून, फुलं वाहून, उदबत्ती लावून, प्रार्थना करून ठेवण्याची वस्तू नसून विश्वाचे व निसर्गाचे सर्व सिध्दांत व तत्त्वे यांचे शास्त्रीय मार्गदर्शन करणारा हा एक अमोल ग्रंथ आहे. पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, निसर्गशास्त्र व इतर भौतिकशास्त्राचे सिध्दांत काव्यमय, सुबोध, तरल व संवेदनक्षम अशा भावनेने काव्यात्मक भाषेत मांडून त्याचा सुंदर आविष्कार झाल्याची अनुभूती ज्ञानेश्वरीत येते.
ज्ञानेश्वरीने सापेक्षतावादाच्या सिध्दांताचा, मूल धातू व अणू परमाणूंचा, विविध शक्ती व त्याच्या रूपातरांचा पुरस्कार केला आहे. वस्तू सातत्याने रूपांतरित होते, परंतु तिच्यातील शक्तीचा कधीही नाश होत नाही. सर्व विश्वशक्तीभारित आहे. या विज्ञानातील सिध्दांताचा प्रत्यय ज्ञानेश्वरीत येतो. वस्तूच्या अंतिम स्थितीचे स्वरूप याचाही शास्त्रीय विचार ज्ञानेश्वरीने केला आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन या आजच्या आधुनिक वैज्ञानिकांनी हा विचार गणीतातील समीकरणे व पदार्थ विज्ञानाच्या सूत्ररूपात दिला व त्यासाठी वैज्ञानिक पुरावे सादर केले. या सिध्द्ातांचा व समिकरणांचा उपयोग मानवी जीवनाच्या विकासप्रक्रियेत आपण सातत्याने करीत आल्याचे दिसते. भारतातील महान संतांच्या शिकवणुकीमध्ये व आधुनिक महान शास्त्रज्ञांच्या गणिती सिध्दांतामध्ये कमालीचे साधर्म्य आढळते.
आपणाला असा संभ्रम निर्माण होतो, की भारतातील बहुतेक संतांना औपचारिक शिक्षण नसताना केवळ आपल्या बुद्धीच्या व दृष्टीच्या जोरावर त्यांनी हे अध्यात्मशास्त्रातील शास्त्रीय दृष्टिकोनातून कसे बरे मांडले असतील? कदाचित याचे कारण त्यांच्या बुध्दीची प्रगल्भता विश्लेषणात्मक तरलबुध्दी, योग्य विचारशक्ती, तार्किक सुसंगती व मानवी कल्याणाबद्दल त्यांना वाटणारी तळमळ यामुळे ते अंतर्मुख झाले व त्यांना एक प्रकारची अंतर्दृष्टी प्राप्त झाली असावी. त्याच्यातूनच त्यांनी शास्त्रीय सिध्दांत तत्त्वज्ञानाच्या भाषेत मांडले. त्यांना गणिताची वा पदार्थ विज्ञानाची सूत्ररूप पध्दती अवलंबण्याची तेव्हा गरज वाटली नाही. वास्तविक पाहता आईन्स्टाईनसारखे आधुनिक महान शास्त्रज्ञ मूलत: तत्त्वज्ञच आहेत व ते आपले सिध्दांत, तत्त्वे, मूल्ये अध्यात्म क्षेत्रातील अधिकारी पुरूषाप्रमाणे जगात मांडत असतात. फक्त हे सर्व ते समीकरण वा सूत्राच्या रूपात मांडतात व त्याचे पडताळेही देतात.
मा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वैचारिक प्रतिभेची उत्तुंग झेप……
“आर्ईन्स्टाईनसारख्या आधुनिक महान शास्त्रज्ञांनी सापेक्षतावादाचा सिध्दांत E=mc2 या स्वरूपात मांडला. विज्ञान व अध्यात्माचा मिलाप हेच मानवी कल्याणाचे समीकरण आहे. या संशोधनाचा अविष्कार, अणुशक्तीचा विकास, अंतराळाचा अभ्यास मानवाच्या कल्याणासाठीच होत आहे. हेच उद्दिष्ट गतकाळातील संतांचे होते. यावरून हे स्पष्ट होते की महान संत किंवा महान शास्त्रज्ञ यांच्या विचारात साधर्म्य असते. एखाद्या विशिष्ट पातळीला ते एकाच प्रकारचा वैश्विक कल्याणाचा विचार मांडतात, फक्त अविष्काराची भाषा वेगळी असते. त्यांचे ध्येय, त्यांची शिकवण एकच असते. कारण वैश्विक मानवी कल्याणाची कल्पना व्यक्तिसापेक्ष असू शकत नाही.” विज्ञान आणि अध्यात्माचे सर्वोत्कृष्ट भाष्य त्यांनी संत ज्ञानेश्वर ते अल्बर्ट आइनस्टाईन या लेखात केले.
माऊंट अबूच्या नळीदाट पानावर……
सर्व जगातील खरे संत, सुफी, ऋषी, मुनी व २० व्या शतकातील सर्व शास्त्रज्ञ यांचे ध्येय एकच आहे आणि ते म्हणजे सर्व मानवजातीचे सुख, शांती व समाधान. आपण नेहमीच संत, ऋषी, मुनी म्हटले की, त्या सर्वच गोष्टी धार्मिक मानतो, अंधश्रध्देच्या मानतो. परंतु एक ध्यानात असू द्या की, खरं म्हणजे संत किंवा शास्त्रज्ञ दोघेही आपआपल्या मार्गाने एकाच गोष्टीचा शोध घेत असतात व शेवटी निसर्गाचं कोडं, जीवनाचं कोडं, जीवनाचं गणित आपआपल्या परीने, सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी निसर्गाचं, जीवनाचं एखादं मूलतत्त्व ते शोधून काढतात आणि जगापुढे मांडतात. २० व्या शतकातील शास्त्रज्ञ हे कोडं, गणिताच्या, पदार्थ विज्ञानाचे समीकरण वा स्वरूप देऊन जगाला सांगतो व आमचे संत निसर्गाचा तोच नियम वा तत्त्व व तेच सूत्र अत्यंत काव्यात्म पध्दतीने, शब्दरूप करून सांगतो. एवढाच फरक, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या । जय जय स्वयंवेद्या आत्मरूपा । या श्लोकामध्ये आद्या हा शब्द अल्टीमेट स्टेट ऑफ मॅटर म्हणजे जगातील सर्व व्याप्त अशा पदार्थांचे अंतिम स्वरूप काय, असा हा विषय आहे. ॲटॉमिक स्ट्रक्चर असो वा न्यूटॉन, प्रोटॉनसारख्या अतिसूक्ष्म अशा कणाचा शोध असो, हे सर्व निसर्गाचे भाग आहेत व त्याचा अंतिम रूपाचं दर्शन आहे. जेवढा कण सूक्ष्म तेवढी त्याची शक्ती जास्त असाही एक सिध्दांत आहे. गीतेच्या व ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाचा व अर्जुनाचा संवादच एवढा बोलका आहे की, कृष्ण परमात्माच अर्जुनाला सांगतो आहे – हे अर्जुना, तुला जर खंर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर तू प्रथम विज्ञान समजून घे । इथे अत्यंत स्पष्टपणे कृष्णाने विज्ञान असा शब्द वापरला आहे. आपल्याला वाटत असेल की विज्ञान वा सायन्स् हा शब्द इंग्लंडमध्ये दोन अडिचशे वर्षापूर्वी जेम्सवॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला तेव्हा पुढे आला. खरं म्हणजे या भारत देशामध्ये किमान ५००० वर्षापूर्वी विज्ञान या शब्दाचा व विज्ञानाचा खरा अर्थ कृष्णाने अर्जुनाला समजावून सांगितला आहे. आपल्याला मात्र त्याचा विसर पडला, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे.
कृष्णाने अर्जुनाला विज्ञानाची पूर्ण व्याख्या सांगितली, फक्त तीनच शब्दांत ! “प्रपंच ज्ञान ते विज्ञान.” ‘’स्वरूप ज्ञान ते ज्ञान” “स्व” रूप, स्वत:चे खरे अंतरंग आत्म्याचे खरे स्वरूप समजणे, जीवनाचे खरे अंतिम ध्येय व उद्देश समजणे याला त्यांनी “स्वरूप ज्ञान” वा खरे ज्ञान म्हटले आहे. मित्रहो, इतकी सुंदर, परिपूर्ण व वैज्ञानिक व्याख्या विज्ञानाची व ज्ञानाची जगाच्या पाठीवर कोणीही दिली नाही.
जे जन्मले ते नाश पावणार व जे नाश पावले ते पुन्हा उगवणार हे निसर्गाचे ज्ञानेश्वरीतील तत्त्व म्हणजे दुसरे तिसरे काही नसून पदार्थ विज्ञानाचा पहिला नियम आहे. निसर्गातील प्रत्येक क्रिया, प्रक्रिया नेहमी एकाच दिशेने घडते व ती नेहमी डिसऑर्डर वा विस्कळीतपणा निर्माण करते हा सिध्दांत म्हणजे दुसरे तिसरे काही नसून पदार्थ विज्ञानाचा जो तिसरा नियम (लॉ ऑफ इनक्रिज ऑफ एन्ट्रॉपी) आहे. ज्ञानेश्वरांनी स्पष्टपणे असे म्हटले आहे की, “अग्नी पाण्यात वास करतो” वा “अग्नी पाण्यात राहतो” किती गंमत आहे पहा. अग्नीच पाण्याने विझून जातो, संपून जातो, असं असताना अग्नीच पाण्यात राहतो असे म्हणणे, म्हणजे तत्त्वाला बाधा आल्यासारखं वाटतं. परंतु ज्यांनी या विश्वाच्या उत्पत्तीचा सखोल अभ्यास केला होता, त्याचं चिंतन केलं होतं व ज्यांना निसर्गातील पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वाची जाण होती त्यांनी या गोष्टीचा खूप खोल विचार करून वरील तत्त्व सांगितले आहे, हे आपण थोडासा सध्याच्या विज्ञानावर आधारित विचार केला तर कळू शकेल. आपल्या वेदांना धार्मिक ग्रंथ न मानता, त्यातील कर्मकांडाचा भाग वगळून इतर सर्व तात्त्विक विषयांचे मनन-चिंतन व्हावे. त्याकडे वेदशास्त्र म्हणून पाहावे. गाथा व ज्ञानेश्वरी हे वैज्ञानिक व जीवनाचे ग्रंथ म्हणून त्याकडे डोळसपणे पाहावे. वैज्ञानिक जीवनाला खऱ्या अर्थाने अध्यात्माचा स्पर्श व्हावा, हीच प्रार्थना.